हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उपनेते राजन साळवी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील होणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. आता खुद्द राजन साळवी यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे, इतरांनी मला निष्ठे बद्दल शिकवू नये असं म्हणत त्यांनी या सर्व चर्चांबद्दलची हवाच काढली.
राजन साळवी म्हणाले, माझी बदनामी कोण करत हे मला माहित आहे, पण मी त्यांना भीक घालत नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा सैनिक आहे. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळेचा आमदार म्हणून मी निवडून आलो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला शिवसेना उपनेतेपद दिले. माझी संपूर्ण वाटचाल शिवसेनेमुळेच झाली. त्यामुळे माझ्या निष्ठे बद्दल कोणी शिकवू नये असं म्हणत राजन साळवी यांनी सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.
https://www.facebook.com/merajansalvi/videos/1052413932084871/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C
विधिमंडळाच्या अधिवेशनात मी पहिल्या दिवशी सहभाग घेतला. नंतर मी आदित्य ठाकरेंसोबत दौऱ्यावर होतो. अलिबाग, महाडच्या विधानसभा मतदार संघात गेलो. यापूर्वी सुद्धा आदित्य ठाकरेंसोबत मी सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापूर भागाचा मी दौरा केला आणि इथून पुढेही मी त्यांच्यासोबत महाराष्ट्र दौरा करणार असं राजन साळवी म्हणाले.
मतदारसंघातील कामासाठी सरकारमधील मंत्र्यांना भेटावं लागत, त्यात काही चूक नाही. पण माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे. मी प्रामाणिकपणे ठाकरेंसोबत आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत पण मी मरेपर्यंत उद्धवसाहेब, आदित्य साहेबांसोबत काम करणार आहे. तोच माझा अंत आहे असे राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.