सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कराड नगरपालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या विरोधात सबळ पुरावे देऊनही कारवाई होत नाही.त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अन्यथा मी त्यांच्या दालनात आत्मदहन करेन असा थेट इशारा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी दिला आहे. राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी ते बोलत होते.
यावेळी इम्रान मुल्ला यांनी म्हंटल की, कराड नगरपालिकेतील भ्रष्ट्राचाराविरोधात २७ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करत आहोत. मात्र सदर व्यक्तींची १५ दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं पत्र आम्हाला दिल्याने आम्ही आज उपोषण स्थगित करत आहोत. परंतु मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट, कराड नगरपालिका मुख्य अधिकारी रमाकांत डाके, त्यांचे कर्मचारी रवी ढोणे, अर्जुन कोळी असतील या सर्वांवर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी कारवाई केली नाही तर मी त्यांच्या दालनात आत्मदहन करेन असा इशारा दिला.
आज मी गप्प आहे पण इथून पुढे हा प्रकार चालणार नाही. जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी कराड मध्ये येऊन बघावं की, कराड नगरपालिकेत रमाकांत डाके आणि त्यांच्या टीमने कसला प्रकार केला आहे . 24*7 पाणीपुरवठा योजना फक्त हवेमध्ये मीटर फिरतोय आणि हे ३-३ हजार , ५-५ हजाराची बिले पाठवतायत. आणि बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्याची धमकी देतात, विनाकारण नागरिकांना त्रास द्यायचं काम सुरु आहे. प्रत्येक कामात यांचा भ्रष्ट्राचार झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी हा प्रकार थांबला पाहिजे आणि कराडकरांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.