विशेष प्रतिनिधी । शुभम भोकरे
गेल्या जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला होता. पण इंग्लंडचा हा विजय वादग्रस्त ठरला होता तो आयसीसीच्या एका नियमामुळे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना जेव्हा टाय झाला तेव्हा सामना सुपर ओव्हरमध्ये केला. दोन्ही संघांनी सुपर ओव्हरमध्ये देखली समान धावा केल्या. पण इंग्लंड संघाने सर्वाधिक चौकर मारल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ केला होता. पण त्यांना आयसीसीच्या नियमामुळे विजेतेपद मिळाले नाही. अंतिम सामन्यातील या निकालावर आजी-माजी क्रिकेटपटूंसह सामन्या चाहत्यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली होती. आता या वादग्रस्त नियमात आयसीसीने बदल केला आहे.
यापुढे सेमीफायनल अथवा फायनल सामन्यात दोन्ही संघांनी समान धावा केल्या तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. दोन्ही संघांनी जर सुपर ओव्हरमध्ये देखील समान धावा केल्या तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर तोपर्यंत खेळवली जाईल जोपर्यंत कोणताही एक संघ जिंकत नाही. यासंदर्भात आयसीसी बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आयसीसी क्रिकेट समिती, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीच्या शिफारसीनंतर सुपर ओव्हर मधील नियम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत ८ बाद २४१ धावा केल्या होत्या. इंग्लंडने देखील ५० षटकात २४१ धावा केल्या. समान धावा झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत एका षटकात १५ धावा केल्या. बदल्यात न्यूझीलंडने देखील १५ धावाच केल्या. पण इंग्लंडने न्यूझीलंडच्या तुलनेत अधिक चौकार मारल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. आयसीसीच्या सुपर ओव्हरमधील या निर्णयावर दिग्गज क्रिकेटपटूंनी टीका केली होती. आता याच नियमात आयसीसीने मोठा बदल केला आहे.आयसीसीने सुपर ओव्हरच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय कोणत्या स्पर्धेपासून लागू करायचा याबाबत अद्याप काहीच ठरवण्यात आलेले नाही.