हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. हा क्षण भारतासाठी सर्वात जास्त अभिमानास्पद होता. चंद्रयान 3 मोहिमेला यशस्वी बनवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र घाम गाळला आहे. परंतु ज्या शास्त्रज्ञाने चंद्रयान 3 मोहिमेत लॉन्चपॅड तयार करण्याची भूमिका बजावली त्याच शास्त्रज्ञांचा पगार गेल्या 18 महिन्यांपासून झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे. रांचीतील हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनच्या अभियंत्यांना पगार मिळालेला नसल्यामुळे त्यांच्यावर बेताची परिस्थिती आली आहे.
2800 कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही
झारखंडमधील रांचीतील एचईसीमध्ये कार्यरत असणारे दीपक कुमार यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सध्या ते इडली विकून त्यांचा उदरनिर्वाह भागवत आहेत. कारण गेल्या 18 महिन्यांपासून त्यांचा पगार करण्यात आलेला नाही. दीपक कुमार यांच्यासोबत तब्बल 2800 कर्मचारी असे आहेत, त्यांचा पगार गेल्या अनेक महिन्यांपासून झालेला नाही. सध्या दीपक यांची ही व्यथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र दीपकसोबत इतरही कर्मचारी याच परिस्थितीतून जात आहेत. दीपक यांच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे आता ते इडली विकण्याचा व्यवसाय करत आहेत.
HEC ने मदत केल्याचा इस्रोचा नकार
2012 मध्ये दीपक एका खाजगी कंपनीत काम करत होते. ज्या ठिकाणी त्यांना 25 हजार वेतन मिळत होते. एचईसीमध्ये ते 8 हजार रुपयांच्या पगारावर रुजू झाले. सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांनी ती हसत स्वीकारली. एचईसीने 2003-2010 च्या काळात इस्त्रोला मोबाईल लॉन्चिंग पॅड पेडस्टल, हॅमर हेड टॉवर क्रेन, ईओटी क्रेन, फोल्डिंग कम वर्टिकल रिपोजिशनेबल प्लॅटफॉर्म, हॉरिझाँटल अशा गोष्टींचा पुरवठा केला. तसेच त्यांनी चंद्रयान 3 साठी लॉन्चपॅड देखील बनवून दिले. मात्र आपल्याला एचईसीने कोणतेही लॉन्चपॅड बनवून दिले नाही असा दावा इस्रोच्या अधिकाऱ्याने केला. ज्यामुळे कंपनीला त्याचा मोबदला देखील मिळाला नाही.
कंपनीला लॉन्चपॅडचा मोबदला न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार अजूनही झालेला नाही. पगार न झाल्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत अडकले आहेत. सुरुवातीला दीपक यांनी पगार नसल्यामुळे क्रेडिट कार्डवर घर चालवले. मात्र त्याचे देखील कर्ज चढले. आता दीपक यांच्यावर 4 लाखांच कर्ज आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी इडलीचं दुकान सुरू केलं आहे. दिवसाला ते 300 – 400 रुपयांची विकतात. यातून जे पैसे येतात त्यातून ते घर चालवतात.