डॉ. जेरे यांनी विद्यार्थ्यांना विविध समस्या अवगत करुन दिल्या आणि त्यातून मार्ग काढून नवोपक्रम चालू करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी यावर भर दिला. ते म्हणाले की, फक्त उत्कृष्ट उद्योग कल्पना असणे पुरसे नाही, तर कल्पनेचे उद्योगधंद्यामध्ये रुपांतर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी उद्योग कल्पनेला उद्योगात परिवर्तित करण्यासाठी उत्पादन आराखडा तयार करणे आवश्यक आहे. मानव संशोधन विकास मंत्रालयाद्वारे लागू करण्यात आलेल्या ‘‘नॅशनल इनोव्हेशन पॉलिसी”ची विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही डॉ. जेरे यांनी केले.
डॉ. उमराणी म्हणाले की, विद्यापीठाने योग्य वेळी ‘इनोव्हेशन 2 एंटरप्राईज’ कक्षांची स्थापना महाविद्यालयांमध्ये केली आहे. त्या माध्यमातून ‘इनोव्हेशन 2 एंटरप्राईज’ स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. या संधीचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपयोग केला आहे.
स्पर्धेची पार्श्वभूमी मांडताना डॉ. पालकर म्हणाल्या, Analogical Thinking विकसित करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल व नविन कल्पनेचे रुपांतर उद्योगधंद्यात करण्यात मदत मिळेल. डॉ. प्रफुल्ल पवार यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व त्यांना नाविन्यपूर्ण कल्पनांवर जोर देऊन विचार करण्याच्या संधीचा उपयोग करण्यासाठी प्रवृत्त केले.