औरंगाबाद : जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासत आहे, केंद्रावर लसी उपलब्ध आहे पण लसीकरण केंद्रावर टोकन वाटपावरून हाणामारी झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. या कारणामुळे महापालिका प्रशासन सावध झाले असून, नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी बंधनकारक करण्यात येईल. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सोमवारी असे सांगितले की, आता नऊ ते दहा या वेळेतच टोकनचे वाटप करण्यात येईल.
लसींचा मोठ्या प्रमाणात झालेल्या लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रावर रांगेत उभ्या नागरिकांमध्ये वाद होत आहे. टोकन वाटपाच्या वेळी घरातील एखादी व्यक्ती रांगेत उभी असते ती जागेच आपल्या कुटुंबियांना रांगेत उभे करते या कारणाने मागील उभे असलेले नागरिक वाद घालतात.
या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, प्रत्येक लसीकरण केंद्रावर नऊ ते दहा दरम्यान टोकन वाटप करण्यात येणार आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार टोकन देण्यात येईल. या आधी केंद्रावर काही जणांकडून आलेल्या यादीनुसार टोकन दिले जात होते, अशी पद्धत बंद करण्यात येईल अशा सूचना केंद्र प्रमुखांना दिल्या आहेत.