… तर शिवरायांचा पुतळा पडला नसता; गडकरींनी सांगितली ती चूक

nitin gadkari shivaji maharaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्ट्राचार झाला असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे पडला असा अजब तर्क मांडला. यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शिवरायांच्या पुतळा उभारणीवरून एक मोठं विधान केलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर तो पुतळा पडला नसता असं गडकरींनी म्हंटल आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, मी मागील ३ वर्षांपासून सांगत आहे कि समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात जे उड्डाणपूल बांधण्यात येतात त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, कारण मला माहित आहे कि, मी मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा एका व्यक्तीने मला मूर्ख बनवले होते. तेव्हा त्याने मला उड्डाणपूलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडावर पावडर कोटिंग वापरण्यात आल्याचे दाखवले होते. या पावडर कोटिंगमुळे लोखंड गंजणार नाही, असा दावा त्याने केला होता. मात्र, नंतरच्या काळात मुंबईतील उड्डाणपूलांसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागला. त्यामुळे आता मला असे वाटते की, समुद्रकिनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात रस्त्यांचे बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचाच वापर करण्यात यावा. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा स्टेनलेस स्टीलचा असता तर तो पुतळा पडला नसता, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती.जयदीप आपटे या शिल्पकाराने हा पुतळा उभारला होता. शिवरायांचा हा पुतळा तयार करण्यासाठी तब्बल 2 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र, आठ महिन्यांमध्ये हा पुतळा पडल्याने महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहेत तर दुसरीकडे या मुद्द्यावरून विरोधी पक्षही आक्रमक झाला असून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याला अटक करण्यात आली आहे तर जयदीप आपटे हा फरार झाला असून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पोलिसांची पथके जयदीप आपटेचा शोध घेत आहेत.