उस्मानाबाद : जिल्ह्याचे कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण विचारात घेण्यासाठी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर तपासण्यांचाच निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, आता अँटिजेन तपासणी निगेटिव्ह आली तर आरटीपीसीआरसाठी सँपल घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिल्यात. त्यामुळे गेल्या आठवड्यात दररोज २०० पर्यंत होणाऱ्या तपासण्या आता ४०० वर पोहोचल्या आहेत.
अँटिजेन टेस्टबद्दल काही रुग्णांमध्ये सुरुवातीपासूनच संभ्रम आहे. काही रूग्ण रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले मात्र, आरटीपीसीआर तपासणीत त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे संभ्रम वाढत गेला. पण प्रशासनाने त्यातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तपासण्यांना प्रतिसाद मिळत गेला. मात्र, आता राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट विचारात घेण्यासाठी आरटीपीसीआर अहवाल गृहीत धरले जातील, असे सांगितले.
कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसीचा धोका
कोरोना विषाणू संसर्गातून सावरलेल्या बालकांना आता एमएसआय-सी अर्थात मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम नावाच्या आजाराचा धोका आहे. या सिंड्रोममुळे शरीराचे अनेक अवयव प्रभावित होतात. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३ बालकांस हा आजार जडला होता. बालके उपचाराअंती ठणठणीत झाले आहेत. मात्र पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.