हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आला असून टीम इंडिया नव्या प्रशिक्षकाच्या तयारीत आहे. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एकमेव अर्ज प्रशिक्षक पदासाठी दाखल झाला असून काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौतम गंभीरची मुलाखत सुद्धा घेतली होती. या मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने १-२ नव्हे तर तब्बल ५ अटी बीसीसीआयला घातल्या आहेत. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जर २०२५ च्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाला जिंकवू शकले नाहीत तर आपण या दोन्ही खेळाडूंना संघाबाहेर काढू असं गंभीरने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितलं आहे.
गंभीरच्या 5 मुख्य अटी कोणत्या ?
बोर्डाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय संघाच्या क्रिकेट ऑपरेशन्सवर त्याचे पूर्ण नियंत्रण असेल, अशी मागणी गंभीरने केली.
गौतम गंभीर स्वतः फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी प्रशिक्षकांसह स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडेल.
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, पाकिस्तानमधील 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या चार वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असू शकते. जर हे खेळाडू भारताला जिंकवू शकले नाहीत तर त्यांना संघातून वगळण्यात येईल. मात्र, तिन्ही फॉरमॅटमधून खेळाडूंना वगळण्यात येईल कि नाही याबाबत स्पष्ट माहिती नाही.
गंभीरची चौथी अट म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये वेगळा संघ असेल.
पाचवी अट म्हणजे तो स्वतः 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करण्यास सुरुवात करेल.
दरम्यान, विराट, रोहित, जडेजा आणि शमी या चार वरिष्ठ खेळाडूंनी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कामगिरी न केल्यास त्यांना संघातून वगळले जाईल हे अगदी स्पष्ट असले तरी, हे सर्व खेळाडू कसोटी संघात कायम राहतील का? हा प्रश्न कायम आहे. ३५ पेक्षा जास्त वय झालेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या वरिष्ठ खेळाडूंचे भविष्य आधीच अनिश्चित आहे. त्यातच गंभीरचे नाव भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदाशी जोडले गेल्यानंतर या दोन दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवल्यास आश्चर्य वाटणार नाही.