नवी दिल्ली । जगभरात 8 मार्च रोजी म्हणजेच दोन दिवसांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यावेळी महिला दिनानिमित्त तुम्हाला तुमच्या पत्नीला एखादे गिफ्ट द्यायचे असेल तर तिच्या नावावर गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र, अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही टॅक्स कसा आकारला जातो, हे देखील माहीत असायला हवे.
इन्कम टॅक्स नियमानुसार पतीने पत्नीच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केल्यास ती भेट म्हणून गणली जाईल. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्मच्या शेड्यूल EI मध्ये पत्नीने गुंतवणुकीची रक्कम मुक्त उत्पन्न म्हणून उघड केली पाहिजे असे टॅक्स एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे.
उदाहरणाद्वारे ‘हे’ समजून घेऊया…
समजा, पतीने पत्नीच्या नावाने सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS) मध्ये गुंतवणूक केली असेल तर व्याजाचे उत्पन्न त्याच्या ITR च्या शेड्यूल SPI मध्ये त्याच्या एकूण उत्पन्नात जोडले जाईल. मात्र, पत्नीने इतके जमा केलेले उत्पन्न उघड करणे आवश्यक नाही.
नातेवाईकांकडून मिळालेल्या कॅश गिफ्ट्सवरील टॅक्स
इन्कम टॅक्स नियमांनुसार, नातेवाईकांकडून मिळालेल्या कॅश गिफ्ट्स पूर्णपणे टॅक्स फ्री असतात. नातेवाईकांमध्ये पती किंवा पत्नी, भावंड, पती किंवा पत्नीचा भाऊ किंवा बहीण यांचा समावेश असेल.
इतरांकडून मिळालेल्या कॅश गिफ्ट्सवरील टॅक्स
इन्कम टॅक्स कायदा, 1961 च्या कलम 56(2)(x) नुसार, एखाद्या व्यक्तीला मिळालेली एकूण संपत्ती एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यावर टॅक्स द्यावा लागेल. अशा रकमेवर इतर स्त्रोतांकडून मिळकत म्हणून टॅक्स आकारला जातो. टॅक्स एक्सपर्ट बलवंत जैन म्हणतात की,” एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक लोकांकडून मिळालेली एकूण रोख रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, अशा रकमेवर लागू स्लॅब दरानुसार टॅक्स आकारला जाईल. त्यामुळे, टॅक्स टाळण्यासाठी आर्थिक वर्षात मिळालेल्या गिफ्ट्सची एकूण रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावी.