सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बनावट बियाण्यांचा प्रकार निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
सातारा जिल्हा दौऱ्यावर कृषी मंत्री दादा भुसे आले असून त्यांनी सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी खरीप हंगामाबाबत माहिती घेऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. कृषी आढावा बैठकीत सातारा कृषी विभागाने बनावट बियाणे बाबत केलेल्या कारवाईचे कौतुकही कृषी मंत्र्यांनी केले. यावेळी त्यांनी बनावट बियाणाबाबत फाैजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.
दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : कृषीमंत्री दादा भुसे
मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी बाबत घाई न करता पावसाचा अंदाज घेऊन 70 ते 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे आवाहन या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी केले आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर सोयाबीनला चांगला भावही मिळत असल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा सोयाबीन पेरणीची गडबड करण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस चांगला होत असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पोषक वातावरण असले तरी अचानक पाऊस थांबण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते याही सूचना दादा भुसे यांनी केल्या.