नवी दिल्ली । बँक ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे की, काही बँकांनी त्यांच्या काही सेवांचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँकेने त्यांच्या काही सेवा शुल्कात वाढ केली आहे. बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज, लॉकर चार्ज आणि खाते बंद करण्याचे चार्ज वाढवले आहे.
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक सेवांसाठीचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. आता महानगर मधील ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान 10 हजार रुपये बॅलन्स ठेवावा लागणार आहे. अन्यथा, त्यांना वेगळी फी भरावी लागेल. हा नवीन नियम 15 जानेवारीपासून लागू होणार आहेत. मिनिमम बॅलन्स लिमिट ग्रामीण शाखेत 1000 रुपये, शहरांमध्ये 2000 रुपये, शहरी शाखेत 5000 रुपये आणि मेट्रो शहरांमध्ये 10,000 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी मेट्रो शहरांच्या शाखेत ही लिमिट 5000 रुपये होती.
बँकेने सांगितले की, जर मिनिमम बॅलन्स राखला नाही तर आता ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना प्रति तिमाही 400 रुपये शुल्क द्यावे लागेल. आधी ते 200 रुपये प्रति तिमाही होते. त्याचप्रमाणे, शहरी आणि मेट्रो भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात पुरेशा बॅलन्स न ठेवल्याबद्दल 600 रुपये तिमाही शुल्क भरावे लागेल. यापूर्वी हे शुल्क प्रति तिमाही 300 रुपये होते.
लॉकर चार्जही वाढले
पंजाब नॅशनल बँकेने लॉकरच्या चार्जमध्येही वाढ केली आहे. आता बँकेचे ग्राहक वर्षातून 12 वेळा त्यांच्या लॉकरला फ्री व्हिझिट देऊ शकतात. यानंतर, त्यांच्याकडून प्रत्येक व्हिझिटसाठी 100 रुपये आकारले जातील. पूर्वीच्या ग्राहकांना वर्षभरात 15 फ्री व्हिझिट मिळत असत. बँकेने लॉकर चार्जही 250 रुपयांवरून 500 रुपये केला आहे.
करंट अकाउंटवर जास्त चार्ज
PNB मध्ये, जर तुम्हाला करंट अकाउंट उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत ते बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी 800 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी हे शुल्क 600 रुपये होते.
एचडीएफसी बँकेनेही वाढवला आहे चार्ज
पंजाब नॅशनल बँकेच्या धर्तीवर, खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपल्या अनेक सेवांसाठीचे शुल्क वाढवले आहे. बँकेने ट्रान्सझॅक्शन संबंधित मेसेज चार्ज प्रति मेसेज 20 पैसे वाढवला आहे. 20 पैशांवर जीएसटीही वेगळा भरावा लागेल. पूर्वी हा चार्ज दर तिमाहीला तीन रुपये होते.