औरंगाबाद – दोन वर्षांपासून बॉयफ्रेंडची भेट न झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी औरंगाबादमधली एक गर्लफ्रेंड चांगलीच आतूर झाली होती. मग काय, ही गर्लफ्रेंड मैत्रिणींना घेऊन बॉयफ्रेंडच्या घरासमोरील एका अनोळखी सोसायटीच्या टेरेसवर रोज येऊ लागली. या तीन अनोळखी मुली रोज टेरेसवर येऊन काय करतायत, असा संशय रहिवाश्यांना आला. त्यानुसार लोकांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा ठरवलं आणि शहरातील दामिनी पथकाला पाचारण केलं. दामिनी पथकातील अत्यंत सजग, कर्तव्यदक्ष पोलिसांनी संपूर्ण प्रकरण समजून घेत, मुलींची चांगलीच कानउघडणी केली.
शहरातील दामिनी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एएस क्लब हॉटेलच्या पाठीमागील भागात स्नेहा वाटिका सोसायटी आहे. तेथील एका इमारतीच्या टेरेसवर मागील तीन दिवसांपासून तीन मुली येत होत्या. विशेष म्हणजे या मुली विशिष्ट कॉलेजचा ड्रेस घालून येत असत. सुरुवातीला त्या कुणाला तरी भेटायला आल्या असतील आणि नंतर टेरेसवर बसल्या असतील, असे नागरिकांना वाटले. मात्र नंतर चौकशी केल्यास सोसायटीतील कुणाचीही त्यांच्याशी ओळख नव्हती. तेव्हा मात्र नागरिकांना संशय आला. त्यांनी रविवारी या मुलींना पकडून ठेवले आणि शहर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
शहर नियंत्रण कक्षाने या घटनेची माहिती दामिनी पथकाला दिली. दामिनी पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस नाईक निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, साक्षी संगमवाड, प्राप्ती साठे या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी सर्वप्रथम या नागरिकांची समजूत घालून मुलींची सुटका करून घेतली. नंतर मुलींची विचारपूस केली असता तिघींपैकी एकीचा बॉयफ्रेंड जवळच्याच एका बंगल्यात रहात असल्याचे कळाले. विशेष म्हणजे बॉयफ्रेंडच्या कुटुंबियांनी मागील दोन वर्षांपासून त्याची भेट दिलेली नव्हती. त्यामुळे त्याची ही मैत्रीण मित्राच्या भेटीसाठी आतूर झाली होती. मग काय.. ही गर्लफ्रेंड आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन त्याला पाहण्यासाठी रोज त्या अनोळखी सोसायटीच्या टेरेसवर जाऊन बसत होती.
बॉयफ्रेंडला द्यायचा होता मोबाइल
दरम्यान, दामिनी पथकाने या मुलींची आणखी चौकशी केली असता प्रेमकहाणीचा पुढचा टप्पाही समोर आला. या भागाची चाचपणी करून बॉयफ्रेंडला मोबाइल घेऊन देण्याचाही त्याच्या मैत्रिणीचा प्लॅन होता. मुलींनीच यासंबंधीची कबूली दामिनी पथकाकडे दिली.या प्रकरणी मुलींना योग्य समज देऊन त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, शहरात समोर आलेली ही अजब प्रेमकहाणी अनेकांच्या चर्चेचा विषय बनली.