सोलापूर | नागपूर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तब्बल पावणे तीन लाख ब्रास मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या जी.आर. इन्फ्रा या बांधकाम कंपनीसह संबधित शेतकऱ्याला सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी तब्बल २९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांच्या दंड केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ही आता पर्यंतची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी तक्रार केली होती. दंडाची रक्कम तात्काळ भरावी यासाठी महसूल विभागाने बांधकाम कंपनी व संबंधीत शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे .
सांगोला तालुक्यातील शिवणे येथे अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन केले आहे. येथील गावकामगार तलाठ्याने १६ डिसेंबर २०२१ पंचनामा केला होता . पंचनामा अहवालात २ लाख ७७ हजार ७५८ ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात गौणखनिज ( मुरुमाचे ) बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे .