अवैध उत्खननातून कोल्हापूर जिल्ह्यातील 100 एकर जमिन नष्ट; संरक्षित वन जमिनीवरच करोडोंचे गैरव्यवहार – असिम सरोदे

कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील टोप जवळील कासारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावरान जमिनीत उत्खननाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याद्वारे १०० एकर जमिन नष्ट करण्यात आलीय. अवैध उत्खननातून करोडोंचे गैरव्यवहार झाल्याचे मत जेष्ठ विधिज्ञ व पर्यावरण कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी व्यक्य केलेय. २०१४ साली करार संपला असला तरी अवैधरित्या हे काम सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचत आहे. सोबतच कासारवाडी गावाला सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भात अनेक वेळा तक्रार दाखल करून सुद्धा कारवाही झालेली नाही. म्हणून ग्रामस्थांनी ऍड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणात याचिका दाखल केली. कायदेशीर प्रकिया सुरू असली तरी उत्खननाचे काम अद्याप थांबलेले नाही अशी ग्रामस्थांनी परत तक्रार केली असता अवैध उत्खननाची पाहणी करून एक स्वतंत्र अभ्यासकांची टीम अहवाल तयार करणार आहे. बोधी रामटेके यांच्या नेतृत्वखालील या टीमने नुकतीच प्रत्यक्ष कासारवाडी भागात होत असलेल्या उत्खनन साईटला भेट दिली.

बोधी रामटेके हे पर्यावरण कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे यांच्यासोबत कार्यरत आहेत. विधी महाविद्यालय पुणे येथील केशव जुगळे, मंदार क्षीरसागर हे सुद्धा उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणी केली असता कुठलीही भीती न बाळगता उत्खननाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, शेतीची नासधूस व आधीपेक्षा जास्त डोंगराचा भाग व्यापला गेला असून तेवढ्याच प्रमाणात जमिनीचे खोलीकरण वाढले असल्याचे दिसले. या संदर्भात स्वतंत्र पाहणी समितीचा अहवाल एनजीटी समोर दाखल करण्यात येणार आहे.

यासंदर्भात स्वतंत्र समितीने जिल्हा खणीकर्म अधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी यांची सुद्धा भेट घेतली. खणीकर्म विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की या विषयावर चर्चा करून आम्ही तहसीलदारांच्या मार्फत पुढील कारवाही करू. राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या अत्यंत स्पष्ट सूचनांचे पालन संबंधित यंत्रणा करीत नसतील तर त्याबाबत गरज पडल्यास ‘न्यायालयाचा अवमान’ केल्याची केस दाखल करण्यात येईल असे ऍड. असीम सरोदे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like