सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने मलकापूर व ओगलेवाडी परिसरात चार ठिकाणी अवैध जुगार अड्यावर छापे टाकून कारवाई केली आहे. या छाप्यात ६ जणांवर कारवाई करण्यात आली असून ५ हजार ३७६ रूपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मलकापूर आणि ओगलेवाडी परिसरात अवैध जुगार अड्यावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये संदीप शामराव मोहिते (वय- ४५, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, आगाशिवनगर), अनिल तानाजी जावळे (वय- २८, रा. रूक्मिणीनगर, मंगळवार पेठ, कराड), राहूल आप्पासो पाटील (रा. ओगलेवाडी), अमिर समीर तांबोळी (रा. हजारमाची) यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हा यांनी बुकीमालक उमेर अल्ताफ मुजावर (रा. मंगळवार पेठ, कराड) आणि मोहनकुमार बाळकृष्ण कुऱ्हाडे (रा. शिक्षक कॉलनी, शिवाजी स्टेडियम जवळ, कराड) यांच्याकरिता चालवित असल्याचे सांगितले.
यावरून वरील ६ जणांवर विविध ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रदिप कदम, राजेंद्र थोरात, राजेंद्र पुजारी, पोलीस हवालदार नितीन येळवे, जयसिंग राजगे, सचिन साळुंखे, संजय जाधव, मारूती लाटणे, प्रफुल्ल गाडे यांनी कारवाई केली.