शेततळ्याचे अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – दिनेश पाटेकर

औरंगाबाद | पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची मागील वर्षी पोकरा या योजनेतंर्गत शेततळे मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेततळे बनवली. मात्र अद्याप शेततळ्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नसल्याने संबंधित शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी पुढाकार घेत शेततळ्याचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावे अशी मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२० या वर्षांमध्ये पोकरा (नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प) अंतर्गत शेततळे मंजूर झालेले असून शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेततळे बनविले. बनविलेल्या शेततळ्याची संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी देखील करण्यात आलेली आहे. या प्रक्रीयेस बराच कालावधी उलटून गेला, तरीदेखील अद्याप शेततळ्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. शेतकरी अगोदरच कोरोना विषाणूमुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यात अनुदान न मिळाल्यामुळे ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यातच सध्या खरीप पेरणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांच्या खिशावर खते, बि-बियाणे खरेदीचा ताण पडतो.

अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर शेततळ्याचे अनुदान जमा झाले तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. या सर्व बाबींचा विचार करून शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने अनुदान जमा करून शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.