आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही; शिवसंग्राम चे आ. विनायक मेटे यांचा राज्य सरकारला इशारा

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या ३५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढत आहोत. जोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही, आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. असा इशारा शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी औरंगाबादेत दिला. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत श्रीहरी पॅव्हेलीयन येथे संघर्ष मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. शिवसंग्रामचे किशोर चव्हाण यांनी या मेळाव्याचे प्रास्ताविक केले. तर झुंजार छावा चे सुनील कोटकर, शिवसंग्राम चे प्रदेशाध्यक्ष तान्हाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत कायदेशीर आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी शहराध्यक्ष उमाकांत माकणे,कार्याध्यक्ष सलीम पटेल,युवक शहराध्यक्ष बालासाहेब भगनुरे पाटील,लक्ष्मण नवले,सचिन मिसाळ,नागेश दांडाईत व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे म्हणाले की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी व मराठा समाजाला सर्व हक्क मिळावेत यासाठी हा लढा आरक्षणाचा संघर्षं मेळावा घेण्यात येत आहे. आघाडी सरकारला आरक्षण न देता केवळ भ्रष्टाचार करायचा आणि ही सत्ता अबाधित ठेवायची आहे. असा आरोप करून आमदार मेटे यांनी या सरकारला केवळ गुंडगिरी सुरू ठेवण्याचा कारभार सुरू ठेवायचा असल्याचे सांगितले. तडीपार असलेले गुंड सोबत ठेवून उद्धव ठाकरेंनी मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. कारण गेल्या ३५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढत आहोत. जोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही, आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.

ही गोरंगरींबांची लढाई आहे, शेतकरी मजूर, कामगारांची आणि त्यांच्या मुलांची लढाई आहे. ही लढाई लढली तरच पुढील पिढ्याचे भविष्य उज्वल होईल. कोणतेही मंत्री, आमदार, खासदार, कारखानदार या लढाईत उतरणार नाही, त्यामुळे आपणच ही लढाई लढावी लागणार आहे. ही श्रीमंतांची लढाई नसून गरिबांची लढाई असल्याचे आमदार विनायक मेटे म्हणाले. मराठा समाजातील मराठा आमदार, खासदार, मंत्री हे सत्तेवर आहेत मात्र तेच मराठा आरक्षणाच्या विरोधात कारनामे करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुंबईत होणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत स्थगिती आलेली आहे. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही निर्णय झाल्याने छत्रपतींच्या स्मारकासाठी शिवसंग्राम रस्त्यावर उतरेल असा इशारा संघर्ष मेळाव्यात आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला. सारथी चे मुख्य कार्यालय पुण्यात करण्याचा घाट पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यानी शाहू महाराजांच्या जयंती दिनीच घातला आहे. याची लाज राज्यात सत्तेवर असलेल्या नेत्यांना वाटत नाही. ज्या करवीर नगरीत शाहू महाराजांच कर्तृत्व आहे तिथे उपकार्यालय करणे म्हणजे या सरकारचा नाकर्तेपणा आहे. येत्या ८ जुलै पर्यंत तडीपार गुंड अटक करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी मेटे यांनी केली.