नवी दिल्ली । गेल्या चार महिन्यांत पूर्व लडाखमधील सीमाभागातील तणावाची परिस्थिती आहे. चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. चीनने या भागात केलेल्या कारवायांमुळेच तेथील आजची स्थिती उद्भवली असल्याचे भारताने गुरुवारी म्हटले आहे. दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. तोडगा निघणे हे केवळ भारत चीनसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले.
भारत आणि चीन यांच्यात याआधीच सीमा करार झाले आहेत. ते सीमा करार दोन्ही देशांनी पाळणे गरजेचे आहे, असे त्यांनी चीनला ठणकावले आहे. सीमेवर जे घडते त्याचे पडसाद दोन्ही देशांच्या संबंधांवर पडतातच, ते तुम्ही टाळू शकत नाही असंही ते म्हणाले. ‘The India Way: Strategies For An Uncertain World’ हे जयशंकर यांनी पुस्तक लिहीले आहे. त्याच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यानंतर जयशंकर यांनी हे विधान केले आहे.
भारत आणि चीन यांनी सीमा प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. चीन आणि भारताने फौजा माघारी घेऊन आपल्या सीमाभागात पोहोचले पाहिजे. तरच नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्तापित होईल. हाच मुत्सुद्दीपणाचा मुद्दा आहे. चीन भारताच्या मार्गात आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, द्विपक्षीय संबंधातील हा “सोपा काळ” नव्हता, परंतु ते म्हणाले की दोन्ही देशांना फौजा माघारी जाणे अत्यावश्यक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.