हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील 7 कोट्याहून नोकरदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EPFO ने २०२४-२५ साल या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.२५ टक्के ठेवले आहे. मागील काही वर्षांतील व्याजदराचा विचार करता, यंदाचा दर स्थिर ठेवण्यात आला आहे, जो नोकरदार वर्गासाठी दिलासा देणारा आहे.
२०२४-२५ मध्ये EPFO ने २.०५ लाख कोटी रुपयांच्या ५.०८ कोटी दाव्यांवर प्रक्रिया केली आहे. ही संख्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. त्यापूर्वी २०२३-२४ मध्ये ४.४५ कोटी दाव्यांवर प्रक्रिया करण्यात आली होती. मागील वर्षीही व्याजदर ८.२५ टक्के होता, जो १.०७ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आधारित होता. तसेच, तो १३ लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवरील आतापर्यंतचा सर्वाधिक व्याजदर ठरला होता.
मागील काही वर्षांतील व्याजदराचा आढावा
भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात मागील काही वर्षांत चढ-उतार झाले आहेत. २०१८-१९ मध्ये ८.६५%, २०१९-२० मध्ये ८.५%, तर २०२१-२२ मध्ये ८.१% व्याजदर होता. २०२२-२३ मध्ये तो ८.१५% पर्यंत खाली आला, परंतु २०२३-२४ मध्ये पुन्हा ८.२५% करण्यात आला. EPFO चा आतापर्यंतचा सर्वाधिक व्याजदर २०१५-१६ मध्ये ८.८%, तर २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५% होता.
EPF मध्ये कसे होते योगदान?
EPF योजनेत कर्मचारी त्यांच्या पगाराच्या १२% रक्कम योगदान देतात, तर नियोक्ता त्यापैकी ३.६७% रक्कम EPF खात्यात जमा करतो. उर्वरित ८.३३% हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेसाठी (EPS) वापरण्यात येतो. याशिवाय, नियोक्ता ०.५०% रक्कम एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात भरतो.
दरम्यान, EPFO च्या या निर्णयामुळे नोकरदारांना दीर्घकालीन बचतीत अधिक स्थिरता मिळणार आहे. हा व्याजदर स्थिर ठेवल्याने कर्मचाऱ्यांचे भविष्यातील आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल. सरकारी धोरणांनुसार भविष्यातही EPFO व्याजदरात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होईल.