नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सोमवार, 15 नोव्हेंबर रोजी राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीत, देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारणा-देणारं व्यवसायिक वातावरण तयार करण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. अर्थ मंत्रालयाने ट्विट केले की, 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या व्हर्चुअल मीटिंगमध्ये अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड देखील सहभागी होतील. याशिवाय केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे सचिव, राज्यांचे मुख्य सचिव आणि वित्त सचिवही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मंत्रालयाने सांगितले की, “या बैठकीतील चर्चेचा विषय गुंतवणुकीसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करणे हा असेल. याशिवाय विकास, सुधारणा, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि सुधारणा-आधारित व्यवसाय वातावरणाची निर्मिती यासाठीच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा केली जाईल.”
कोविड-19 च्या दोन लाटांनंतर अर्थव्यवस्थेचे जलद पुनरुज्जीवन आणि भांडवली खर्च वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थ सचिव टीव्ही सोमनाथन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की,” चर्चेचे केंद्र राज्य पातळीवरील असे मुद्दे, संधी आणि आव्हाने असतील, ज्याद्वारे आपण उच्च गुंतवणूक आणि वाढ साध्य करू शकतो.”
सचिव म्हणाले होते, “सरकार भांडवली खर्च करत आहे आणि खाजगी क्षेत्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, मात्र अद्याप मोठ्या प्रमाणावर खर्या गुंतवणुकीत त्याचे रूपांतर होणे बाकी आहे. मात्र, भांडवली खर्च मोठ्या गुंतवणुकीची क्षमता दर्शवितो.”
गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड-19 महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घसरण झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 20.1 टक्के दराने वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 64 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) देशात आली आहे.