जर भिवंडी-कल्याण-ठाणे मेट्रो 5 प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, या अंतर्गत अंजुरफाटा येथे लोखंडी गर्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे 1 आणि 2 एप्रिलच्या रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भिवंडी शहरातील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याशिवाय, वसई-दिवा रेल्वे वाहतूकही या वेळेत बंद राहणार आहे.
वाहतूक निर्बंध आणि पर्यायी मार्ग
1 एप्रिल रात्री 10 ते 2 एप्रिल सकाळी 6 आणि 2 एप्रिल रात्री 10 ते 4 एप्रिल सकाळी 6 या कालावधीत सर्व वाहनांसाठी भिवंडी शहरात प्रवेश बंद असणार आहे. या काळात शहरात येणाऱ्या वाहनांसाठी मुख्य नाक्यावरच प्रवेश रोखण्यात येणार असून पर्यायी मार्ग दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, अंजुरफाटा येथील वसई-दिवा रेल्वे ब्रीजवर मेट्रो ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू राहणार असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद असणार आहे.
मेट्रो मार्गिका 5
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प प्रगतीपथावर असून, हा मार्ग 24.90 किलोमीटर लांबीचा एलिवेटेड कॉरिडोर आहे. या मार्गावर एकूण 15 मेट्रो स्थानके असतील. मेट्रो लाइन 5 चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे, त्यामुळे भिवंडीकर आणि ठाणे-कल्याणकडे प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. हा प्रकल्प 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, आणि सध्या 80% काम पूर्ण झाले आहे.
3 वर्षांची दिरंगाई आणि नवीन डेडलाईन
मुंबई मेट्रो मार्ग-5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) प्रकल्पाचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 1 सप्टेंबर 2019 रोजी सोपवले गेले होते. 15 स्थानकांचा आणि 24.90 किलोमीटर लांबीचा हा एलिव्हेटेड कॉरिडोर 1 मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या कामात दिरंगाई झाली असून आता नवीन डेडलाईन 31 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे भिवंडी, ठाणे आणि कल्याण या महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास वेगवान आणि सुकर होईल. नागरिकांनी या निर्बंधांची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.




