हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची नुकतीच अचानक तडकाफडकी शासनाने बदली करण्यात आली. त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डुडी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कास, महाबळेश्वर, पाचगणी येथील अतिक्रमणांच्या संदर्भात कायदेशीर बाबींचे तथ्य तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे महत्वाचे विधान केले.
साताऱ्यात नियोजन भवनात नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तत्कालीन जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची सातारा जिल्ह्यात जे चांगले उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास झाला आहे. ते उपक्रमां व चांगल्या परंपरा या पुढे सुरू ठेवल्या जातील.
मी सध्या सातारा जिल्ह्याचा अभ्यास करत आहे. सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या जातील. त्यानुसार जिल्ह्याचे पुनर्वसन, सिंचन, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण यातील कोणते प्रश्न बाकी आहेत ते पाहिले जातील. विशेष म्हणजे शासकीय कार्याला सर्वसामान्यांच्या कामांना कधीही न अडवता तात्काळ ते कसे सोडवता येतील याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे.
मी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत फलटण, निरा, तरडगाव, बरड या पालखी मार्गावरील स्थळांची पाहणी केली. या मार्गावर पायाभूत सुविधा ठेवल्या होत्या. विशेष म्हणजे पालखीतळांवर खाद्यपदार्थ विक्रेते येतात त्यांच्या खाद्यांचे नमुने तपासण्याच्या दृष्टिकोनातून अन्न व औषध प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
महाबळेश्वरप्रमाणे इतर पर्यटनस्थळाचा विकास आराखडा तयार करणार : जितेंद्र दुडी
महाबळेश्वर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शंभर कोटींचा आराखडा केला होता. त्या आराखड्याचा अभ्यास करून त्या धरतीवर सातारा, पाचगणी, कास तसेच इतर ब आणि क वर्ग पर्यटनस्थळे आहेत. त्यांना सुविधा देणारा आराखडा बनवला जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी म्हंटले.