हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर गुडघे टेकायला लागले. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले. अविश्वास प्रस्ताव ठरावात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पाकिस्तानमधील एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.
पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. तर, इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. 342 सदस्यांच्या संसदेत 174 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार कोसळले
दरम्यान, व्यवस्थेविरुद्ध लढणारा मी एकमेव माणूस आहे, कधीही हार मानणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. मला तुरुंगात जावे लागेल पण मी माझ्या देशासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन, असे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले. त्याचबरोबर परकीय षड्यंत्र मी यशस्वी होऊ देणार नाही असेही ते म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक लाहोरमध्ये रस्त्यावर उतरले.