सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीतल्या बामणोली मध्ये असणार्या शिवराज फॅब्रिकेटर मध्ये मीटर मध्ये छेडछाड करून 15 हजार 846 युनिट वीज मोफत वापरून 5 लाख 96 हजारांच्या विजेची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ऑक्टोबर 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत वीज चोरीचा प्रकार सुरु होता. या प्रकरणी महावितरणचे अधिकारी महेशकुमार श्रीरंग राऊत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून वीज चोरी प्रकरणी कोंडीबा शांताराम चिंचकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित कोंडीबा चिंचकर यांचे मिरज तालुक्यातील बामणोली मध्ये शिवराज फॅब्रिकेटर्स या नावाने कारखाना आहे. सदरच्या कारखान्यात महावितरण विभागाने वीजपुरवठा केला होता. चिंचकर यांनी 2019 ते 2021 या दोन वर्षांच्या कालावधीत मीटर मध्ये छेडछाड करून तब्बल 15 हजार 846 युनिट वीज मोफत वापरली. त्याचे बिल 5 लाख 96 हजार रुपये इतके होते.
सदरचा प्रकार महावितरण विभागाच्या वायरमन यांना निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली. त्यावेळी ग्राहकाला नोटीस देण्यात आली. या निटिसीला चिंचकर जुमानत नव्हते अखेर महावितरणचे अधिकारी महेशकुमार राऊत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीज चोरी प्रकरणी चिंचकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.