हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात भेटीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. अनेकवेळा, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकार मुख्यमंत्री किसान अपघात कल्याण योजनेंतर्गत मदत करत आहे.
त्यानुसार, शेती करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांना भरपाईच्या स्वरूपात मदत दिली जाते. या योजनेंतर्गत शेती करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंत किंवा अपंगत्व आल्यास 2 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्याची मुलगी, पत्नी, नातू, मुलगा, आई, वडील याशिवाय शेतीच्या वाटा पिकात सहभागी असलेल्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असावे.
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यावर व शेतकरी अपंग झाल्यावर शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी अपघात झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म जवळच्या तहसील कार्यालयात जमा करावा. याशिवाय, उशीर झाल्यास, शेतकऱ्याला डीएमच्या स्वाक्षरीसह एक अर्ज सादर करावा लागेल. यानंतर सरकारच्या निरीक्षणानंतर शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातात.