इचलकरंजी : हॅलो महाराष्ट्र – इचलकरंजी या ठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बायको आणि मुलीच्या अनैतिक संबंधामुळे बापाला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत बापाचे नाव शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे असे आहे. डोक्यात वार करुन शांतिनाथ यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून आरोपी मायलेकींना अटक करण्यात आली आहे. साक्षी केटकाळे आणि सुजाता केटकाळे अशी हत्या करणाऱ्या आरोपी मायलेकींची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मायलेकीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला म्हणून हत्या
मृत शांतिनाथ केटकाळे हे पत्नी आणि तीन मुलींसह बर्गे मळा परिसरात राहत होते. केटकाळे कुटुंबीय शेती व्यवसाय करीत होते. शांतिनाथ यांची पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघींचेही बाहेर प्रेमसंबंध सुरु होते. शांतिनाथ यांना बायको आणि मुलीच्या प्रेम संबंधाची माहिती मिळाल्यावर घरात मोठा वाद झाला. शांतिनाथ यांनी मुलगी आणि पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्या ऐकायला तयार नव्हत्या. घटनेच्या दिवशीसुद याच कारणावरून मोठा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात शांतिनाथ यांनी दोघींना मारहाण देखील केली. हा वाद एवढ्या टोकाला गेला कि मुलगी साक्षीने लोखंडी गज आणि बॅटने वडिलांच्या डोक्यात जोरदार वार केला. हा वार इतका भयानक होता कि शांतिनाथचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी मायलेकीला पोलिसांनी ताब्यात घेतले
हि घटना पाहून मृत शांतिनाथ यांच्या दोघी लहान मुलींनी आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले. त्यांनी तात्काळ शांतिनाथ यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र शांतिनाथ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. यानंतर शांतिनाथ यांचे भाऊ महावीर केटकाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी मायलेकींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच शांतिनाथ यांच्या इतर दोन मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.