कबड्डीत पुरूष गटात फलटण तर महिलांच्यात अकलूजचा संघ विजयी

Kabaddi College Sports
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्‍पर्धांची सोपविलेली जबाबदारी सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्‍कृष्‍ठ पद्धतीने सांभाळली, राज्‍यभरातील विविध कृषी महाविद्यालयांतील पुरूषांचे 41 संघ आणि महिलांचे 19 संघ सहभागी झाले होते. महाविद्यालय व्यवस्‍थापन समितीचे अध्यक्ष जशराज पाटील (बाबा) आणि त्‍यांच्या सहकारी संचालकांनी पावसामुळे लाबणीवर पडलेल्‍या स्‍पर्धा पुन्हा मोठ्या उत्‍साहात संपन्न पार पाडल्या. त्‍यामुळे यापुढे आणखी मोठ्या स्‍पर्धांची जबाबादारी दिली, तरी ती पाड पाडण्यासाठी सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सक्षम आहे, असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

सह्याद्रि क्रीडा संकुल, यशवंतनगर (ता.कराड) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचलित, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, यशवंतनगर आयोजित 2022-23 च्या दोन दिवसीय आंतर महाविद्यालयीन कब्बडी क्रीडा स्‍पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते. यावेळी राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी दिलीपराव गायकवाड, सातारा जिल्‍हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, संचालक डी. बी. जाधव, वसंतराव कणसे, बजरंग पवार, रामचंद्र पाटील, जयवंत थोरात, कराडचे विनायक पवार, कारखान्याचे सर्व अधिकारी, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व त्यांचे सहकारी, जिल्हा क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी, सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक, पंच व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व कारखान्याचे सर्व संचालक यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

या स्‍पर्धेमध्ये पुरूष गटामध्ये अंतिम सामन्यात कृषी महाविद्यालय फलटण संघाने विजय संपादन करत प्रथम क्रमांक मिळवला, तर बारामती संघाला दुसऱ्या व कृषी महाविद्यालय सोनाई या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तसेच महिलांमध्ये कृषि महाविद्यालय अकलूज संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. तर कोल्हापूर संघाला दुसऱ्या व शासकीय कृषी महाविद्यालय कराड या संघाना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, सह्याद्रि कृषी महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा सुरळीत पार पडली. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

राहुरी कृषी विद्यपीठाचे क्रीडा अधिकारी दिलीपराव गायकवाड म्‍हणाले की, आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धांची सोपवलेली जबाबदारी महाविद्यालय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष जशराज पाटील(बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने काटेकोरपणे पूर्ण केली. उत्‍तम क्रीडांगण, उत्कृष्ट नियोजन, स्‍वच्छता टापटीप, खेळाडूंची राहण्या-जेवणाची उत्तम व्यवस्था केली. माझ्या 38 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच मी अशी व्यवस्था पाहिली. त्यामुळे मी भारावलो आणि सह्याद्रि समूहाच्या प्रेमात पडलो असे उद्गार काढताच उपस्थित क्रीडा रसिक व खेळाडूंनी एकच जल्लोष करीत टाळ्यांच्या कडकडात त्यांच्या वक्तव्याला दाद दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. सुत्रसंचालन संभाजी चव्हाण यांनी केले. आभार अजित जाधव यांनी मानले.