हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हल्ली कौटुंबिक वादाच्या घटना जास्त घडू लागल्या आहेत. सून सासू, नवरा बायको यांच्यातील वाद तर जीव घेण्यापर्यंत जात आहेत. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथे घडली. या ठिकाणी राहणाऱ्या महिला पोलिसाने कोटुंबिक वादातून आपल्या सासूलाच पेटवून दिले. यात सासू गंभीर जखमी झाली असून आशालता श्रीपती वराळे (वय, ८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) असे त्यांचे नाव आहे. तर संगीता राजेंद्र वराळे (वय ५१) असे संशयित महिला पोलिसांचे नाव असून तिला पोलिसांनी अटकही केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कसबा बावडा येथे राहणाऱ्या संगीता वराळे यांच्यात व सासू आशालता यांच्यात जोरात भांडण झाले. पोलीस दलात हवालदार म्हणून काम करीत असलेल्या संगीता वराळे हिने कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात सासू आशालता यांच्या तोंडावर पेट्रोल टाकले. त्यानंतर कागद पेटवून तो तोंडावर टाकला. पेटलेल्या अवस्थेत सासू आशालता यांनी आरडाओरड केला. त्यामुळे बाजूच्या घरातच राहणारे वराळे यांचे नातेवाईक बाहेर आले. त्यांनी घरात जाऊन आग विझवली.
सासू आशालता या अचानक घडलेल्या प्रकारात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशालता यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. संगीता वराळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे.