धक्कादायक ! पैशांसाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड आणि….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी फरसी पुसण्याचे अ‍ॅसिड पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

फिरदोस रेहान काझी असे पीडित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी फिरदोस रेहान काझी या महिलेच्या तक्रारीवरून पती रेहान काझी, सासू नजमा काझी , नणंद गजाला काझी आणि हीना खान यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला आणि आरोपी रेहान यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर फिरदोस आपल्या पतीसह हांडेवाडी परिसरात राहायला आली होती. याठिकाणी आरोपी पती रेहानने एक फ्लॅट विकत घेतला होता. मात्र या फ्लॅटसाठी फिरदोसने आपल्या माहेरून दोन लाख रुपये घेऊन यावेत, असे रेहानला वाटत होते.

यासाठी आरोपी रेहानने आपल्या पत्नीकडे पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी तो पत्नी फिरदोसला सतत टोचून बोलणं, शिवीगाळ करणं अशाप्रकारे मानसिक त्रास देत होता. यानंतर याच कारणावरून सासू नजमा काझी, नणंद गजाला काझी आणि हीना खान यांनी पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनेच्या दिवशी सासूने सतत सांगूनही पैसे आणत नसल्याच्या कारणातून पीडित फिरदोसला नणंदेंच्या मदतीने फरशी पुसण्याचं अ‍ॅसिड पाजले. यानंतर फिरदोसची प्रकृती खालावली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर कोंढवा पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.