हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामीण भागात किरकोळ कारणांवरून मारामारीच्या घटना घडत आहेत. कुटुंबांमध्ये कोयता, दांडके घेऊन एकमेकांच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडत आहेत. अशात गावातील पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन कुटूंबात मारामारी झाल्याची घटना कराड तालुक्यातील मलकापुरातील विश्रामनगर येथे घडली आहे. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना तलवार, लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. यावेळी आठजण जखमी झाले आहेत. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील सुमारे 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विश्रामनगर येथील राहणाऱ्या रुपेश प्रफुल्ल काळसेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, घराजवळील रिकाम्या जागेत असलेल्या रस्त्याच्या कारणावरून गावातीलच सचिन माळवदे, सोहम सचिन माळवदे, सौरभ सचिन माळवदे आणि सारिका सचिन माळवदे यांनी हल्ला केला. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत रुपेश काळसेकर, त्यांची आई पुष्पा तसेच शेजारी युवराज पाटील व मिथिलेश महिंदकर जखमी झाले. मिथिलेश महिंदकर यांना तलवार लागली आहे.
मारहाण झालेल्या कुटूंबाकडून फिर्याद दाखल झाल्यानंतर याउलट सचिन सुरेश माळवदे यांनी देखील पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रुपेश काळसेकर, पप्पू काळसेकर, योगेश काळसेकर, युवराज पाटील, सुरज यमगर यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी वाहनांवर तसेच घरावर दगडफेक करीत मारहाण केल्याचे सचिन माळवदे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत सचिन माळवदे, त्यांची मुले सौरभ सोहम आणि पत्नी सरिता हे जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार विजय मुळे तपास करीत आहेत.




