सातारा | राज्य उत्पादन शुल्क विभागातून बिअर शाॅपीचे लायसन्स मिळण्यासाठी कार्यालयातील तिघांनी लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लायसन्स मिळविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रकरण देण्यासाठी 3 लाख रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत एसीबीने खात्री करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बियर शॉपीचे लायसन्स प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांना दिले होते. हे प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक दत्तात्रय विठोबा माकर व जवान नितीन नामदेव इंदलकर यांनी तक्रारदाराकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सतीश विठ्ठलराव काळभोर यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम मागणीस प्रेरणा दिली, म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सातारा पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, विशाल खरात, कॉन्स्टेबल संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांनी सापळा रचून लाच मागणार्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा युनिटने यशस्वीरित्या पार पडली.