मद्यप्राशन केलेल्या पोलिस चालकाने आयशर व्हॅनने 2 दुचाकींना उडविले

Satara Police City
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव रस्त्यावर शहरालगत संगमनगर येथे पोलिसांच्या आयशर व्हॅनने दोन दुचाकींना धडक दिली. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना दुखापत झाली आहे. व्हॅन बेदरकारपणे चालवणाऱ्या पोलिसाने मद्यप्राशन केले असल्याचा उल्लेखही तक्रारीत झाल्याने खळबळ उडाली आहे. शहर पोलिस ठाण्यात व्हॅनवरील पोलिस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्वानंद ढाणे या पोलिसा विरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून शांतीलाल छगनलाल रावळ (वय- 62, रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार शांतीलाल रावळ यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संगमनगर बसस्टॉप पुढे अनिल वाघेल हे दुचाकीवरुन डबलसीट जात असताना (एमएच- 12- -सीजी- 9784) या पोलिस आयशर व्हॅनची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील अनिल वाघेल व मनिषा शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले. यानंतर तक्रारदार हे दुचाकीवरुन सोनाली वंजारी यांना घेवून जात असताना वंजारी यांनी बचावासाठी उडी मारल्याने त्यांना दुखापत झाली.

या सर्व घटनेनंतर परिसर हादरुन गेला. अपघातानंतर मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. परिसरातील नागरिक संतप्त झाले. यावेळी पोलिस व्हॅनवरील चालकाला पाहिले असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचा वास येत होता. तक्रारदार यांनीही ही बाब पाहिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असून दोघे गंभीर जखमी असल्याचे समोर आले. तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर पोलिस व्हॅनवरील पोलिस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.