सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा शहरात वाढत्या वाहनांचा विचार करून भुयारी मार्ग म्हणजेच ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. पण फक्त वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या या भुयारी मार्गातून महाविद्यालयाचे विद्यार्थी जीव धोक्यात घालून रोज ये- जा करत आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी शॉर्टकट म्हणून या भुयारी मार्गाचा अवलंब करतात. परंतु या धोकादायक शाॅर्टकटमुळे जीव जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने या योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.
सातारा शहरातील पोवई नाका परिसरात भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. शहरातील मुख्य ठिकाणी वाहतूक कोंडी फुटावी म्हणून ग्रेड सेपरेटर उभारले. यामुळे वाहतूक कोंडी फुटली परंतु आता विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करू लागले आहेत. या विद्यार्थ्याच्या धोकादायक प्रवासावर कोणाचेही नियंत्रण नाही. बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन किंवा महाविद्यालयीन प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. या भुयारी मार्गावर चार बाजूचे रस्ते एकत्र येतात. त्याठिकाणी हे विद्यार्थी रस्ता क्राॅस करतात. अशावेळी भरधाव आलेल्या गाडीने अपघात होण्याची शक्यत आहे.
सातारा बसस्थानक ते यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ महाविद्यालय परिसरात तसेच महाराजा विद्यालय, रयत शिक्षक संस्थेच्या महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या भुयारी मार्गाचा वापर होवू लागला आहे. गेल्या महिन्यात एका दुचाकीचा भुयारी मार्गावर मोठा अपघात झाला होता. आता याच मार्गाने वाहने वेगाने ये- जा करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. या भुयारी मार्गावर विद्यार्थ्यांचा हा धोकादायक पायी प्रवास सुरू आहे. ग्रेड सेपरेटर विद्यार्थ्यांचा जीव घेणार का? जीव गेल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का? यावर प्रशासन काय निर्णय घेणार असा सवाल सातारकर उपस्थित करत आहेत.