सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- सातारा महामार्गावरून सातारा शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करताना लिंब फाट्यावरून मोळाच्या ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री 8.30 वाजता हा तरस प्राणी प्रवाशांना दिसला होता. त्यानंतर चक्क सातारा शहरातील मंगळवार पेठेतील एका घरात तरस घुसला होता. त्यामुळे नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरचा तरस एक आहे की अनेक याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
सातारा शहराजवळून गुरूवारी रात्री प्रवास करताना सौ. श्रीदेवी भोसले, सौ. प्रियांका तारू, श्री. हर्षल तारू आणि त्यांच्या कुटुंबीयांना तरस दिसला होता. या प्रवाशांनी तात्काळ त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. विठ्ठल मंगलमच्या समोर असलेल्या सर्विस रोडच्या पूलाखाली हा तरस प्राणी होता. अचानक दिसलेल्या या तरसामुळे प्रवाशी गोंधळून गेले. तेव्हा त्यांनी वनविभागाने याची तात्काळ दखल घेवून बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा दुचाकीस्वार किंवा सातारकर जिवाला मुकु शकतात, असेही आपल्या संदेशात सोशल मिडियावर म्हटले आहे.
आज शुक्रवारी सकाळी सातारा शहरातील मंगळवार पेठेत दस्तगीर काॅलनीत असाच हुबेहूब दिसणारा किंवा तोच तरस एका घरात घुसला. तरस घरात घुसतानाचा व्हिडिअो सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. त्यामुळे आता सातारकरांच्यात बिबट्या पाठोपाठ तरसामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. तेव्हा वनविभागाने या तरसाचा बंदोबस्त करण्याची मागणी सातारकर करू लागले आहेत.
वनविभाग तरसाच्या बंदोबस्ताठी घटनास्थळी दाखल
वनविभागाने तरस प्राण्यास ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तरस माणसावर हल्ला करित नाही. परंतु लोकांनी गोंधळ करू नये. तसेच लहान मुलांना त्याच्यापासून लांब ठेवावे. तरस हा मांस व कुजलेले अन्न शोधत असते. तेव्हा भीतीचे कारण नाही, परंतु सावधानता बाळगावी. लवकरात लवकर तरसास वनविभाग ताब्यात घेईल, असे वनविभागाचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.