औरंगाबाद : शेतामध्ये फवारणी करत असताना एका तरुण शेतकऱ्यावर पिसाळलेल्या दोन वानरांनी अचानक हल्ला केला आहे. यामध्ये वानरांनी त्याच्या पायाचे लचके तोडल्याने तरुणाच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. यामधील पिसाळलेला वानराने या अगोदर देखील धोत्रा परिसरातील एका महिलेवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील शेतकरी भागवत पाडळे वय 30 वर्ष (रा. पानवडोद) शिवारातील गट क्र. २१० या शेतीमध्ये कपाशीच्या पिकावर फवारणी करत असताना पिसाळलेले दोन वानरांनी बुधवार 30 जून रोजी सकाळी आठ वाजता युवकावर अचानक हल्ला केला. वानरांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे युवक खूपच घाबरून गेला होता. या हल्ल्यात युवकाच्या पायाचे वानराने अक्षरशः लचके तोडण्याचे समोर आले आहे. त्यामुळे पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. बचावासाठी आरडाओरड केल्यानंतर परिसरामधील काही महिला या तरुणाच्या मदतीला धावत आल्यानंतर वानरांनी तेथून पळ काढला व त्याला उपचारासाठी पानवडोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तेथून त्याला पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बाजूला असलेल्या धोत्रा गावातील काही महिलांवर देखील या वानरांनी हल्ला केला होता. बंदोबस्त करण्याची मागणी पिसाळलेल्या वानरांना तात्काळ वन विभागाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी या परिसरातून होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे आणि पिसाळलेल्या वानरमुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.