नियमांचे उल्लंघन केल्याने ‘या’ बँकांवर लाखो रुपयांचा दंड; RBI ची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब अँड सिंध बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. 16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत अगोदरच सूचना देण्यात आली होती. सूचना देऊनदेखील बँकेने निष्काळजीपणा सुरुच ठेवल्याने RBI ने हि कारवाई केली आहे. तसेच बँकेला कारण द्या नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेने इटावा येथील नगर सहकारी बँकेवरदेखील दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.या बँकेनेही नियमांचे पालन न केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

सारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई
भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार मोठ्या सहकारी बँकांवर हि कारवाई केली आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने सारस्वत सहकारी बँकेला 25 लाख तर एसव्हीसी सहकारी बँकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेला देखील दंड ठोठावण्यात आला आहे. महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांवर कारवाई
रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठवला होता. यामध्ये मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या बँकांनादेखील नियमावलीचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला होता. त्याअगोदर रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलादेखील रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.

Leave a Comment