हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आजचा दिवस बँकिंग सेक्टर साठी अत्यंत महत्त्वाची दिवस ठरण्याची शक्यता आहे. सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये दोन सार्वजनिक बँकांचं खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांच्या मते खाजगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आज 14 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आहे.
या बैठकीमध्ये खाजगीकरण होणाऱ्या संभाव्य बँकांबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चार ते पाच PSB ची शिफारस नीती आयोगाकडून करण्यात आली आहे आणि या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालाच्या मते, नीती आयोगाने 4-5 बँकांची शिफारस केली आहे. अशीही माहिती मिळते आहे की, या बैठकीत या दोन बँकांचे नाव निश्चित केले जाईल. खाजगीकरणाच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक या बँकांच्या नावाची चर्चा आहे.
आतापर्यंत याबाबत कोणताही निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. मात्र मंगळवारी या बँकांच्या शेअरमध्ये देखील उसळी पाहायला मिळते आहे. BSE मधील माहितीनुसार अनेक डील्सअंतर्गत एक लाखापेक्षा अधिक शेअर्सना बदलल्यानंतर मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये 15.6 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.