केवळ ‘या’ कारणासाठी भारतीय लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय लष्करात अतिशय रुबाबदार आणि गौरवशाली तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्वदल अर्थात घोडदळाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हं आहेत. या दलात आता घोड्यांऐवजी टँकचा वापर केला जावा असा प्रस्ताव समोर आल्यानं लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. लष्कराचे वाढते खर्च कमी करणे आणि त्यांची युद्धशक्ती वाढवणे याबाबत नेमण्यात आलेल्या समितीनं यासंदर्भातली शिफारस आपल्या अहवालात केली आहे. केवळ उत्सवी महत्व या युनिटला राहिलेलं असून ते बंद करण्यात यावं असही या अहवालात म्हटलं आहे.

निवृत्त सैन्यदल अधिकाऱ्यांचा निर्णयाला विरोध
आजवर देशाच्या सैन्यात असणाऱ्या विविध तुकड्या आणि त्यांच्याविशयी विशेष आत्मियता दिसून आली आहे. घोडदळाविषयीसुद्धा असंच चित्रं. अश्वदलाची परंपरा बंद करण्याच्या निर्णयाला लष्कराचे अनेक निवृत्त अधिकारी विरोध करतायत. ही गौरवशाली परंपरा बंद पडू नये अशी चिंता अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. कालबाह्य होतंय म्हणून जर हे बंद करत असाल तर ते टँक या घोड्यांऐवजी दिले जातायत तेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कालबाह्यच होतायत असं निवृत्त अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. उलट घोड्यावरुन गस्त घालणं हे टँकवरुन गस्तीपेक्षा अधिक स्वस्त आणि सुलभ असल्याचा दावा त्यांनी केला.

अश्वदलाचा खेळ आणि युद्धाच्या मैदानातील पराक्रम
61 घोडदळ युनिटचं मुख्यालय जयपूर इथे आहे. ऑक्टोबर 1953 मध्ये जयपूरमध्ये लष्करातल्या या घोडदळाची स्थापना झाली होती. जयपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी या अश्वदलाची युनिट आहेत. लष्कराच्या गौरवशाली परंपरेचं प्रतीक म्हणून तर या घोडदळाकडे पाहिलं जातंच, पण क्रीडा क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे. एक पद्मश्री, 10 अर्जुन पुरस्कार विजेते, 11 एशियन गेम्स मेडल या अश्वदलानं दिली आहेत. शिवाय पोलो वर्ल्डकपमध्येही अनेकदा भारतानं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक परेडमध्येही या अश्वदलाचा सहभाग असतो. ऑपरेशन पराक्रममध्ये राजस्थानाच्या वाळवंटात या युनिटनं यशस्वी कामगिरी केली आहे.

भारतीय लष्करातील अश्वदल इतिहास आणि आधुनिकता यांना जोडणारा दुवा असल्यानं त्याचं जतन आवश्यक असल्याचं तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment