औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या मागील ऑनलाइन परीक्षेत तब्बल 1 लाख 27 हजार विद्यार्थी नापास झाल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे ऑनलाईन परीक्षात विद्यार्थ्यांची प्रचंड गुणवत्ता वाढली आहे, तर दुसरीकडे नापासांची संख्याही भरमसाठ आहे. याबद्दल पालक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 सत्र परीक्षेसाठी प्राप्त आवेदन पत्रांचे अवलोकन केले असता, तब्बल 1 लाख 27 हजार विद्यार्थी राहिलेल्या पेपर साठी परीक्षा देणार असल्याची बाब समोर आली. या संदर्भात परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, यापैकी काही विद्यार्थी नापास झालेली असून अनेक जणांनी परीक्षा दिली नव्हती त्यामुळे हा आकडा फुगवलेला वाटतो. एरवी ऑफलाइन परीक्षांमध्ये नापासांची प्रमाण 40 टक्के असते तर ऑनलाइन मध्ये हे प्रमाण 25 टक्के असते. त्यामुळे ही आकडेवारी मोठी आहे असे समजणे चुकीचे आहे.
तथापि कालपासून हिवाळी सत्र परीक्षा सुरू झाली आहे. या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याच दिवशी जवळपास अर्धा तास प्रश्नपत्रिका ओपन होत नसल्यामुळे कला शाखेच्या विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. ही बाब विद्यापीठाच्या आयटी समन्वयकांना समजताच त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांची अडचण दूर केली.