कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राज्यात केवळ कराड बसस्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट दर वाढीचा फटका बसू लागला आहे. कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे महामार्गावर उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असून तेथे नवा सहापदरी उड्डाणपूल उभा राहणार आहे. यासाठी आता एसटी बसला जादा अंतर फिरून यावे लागत असल्याने 5 ते 10 रूपये तिकिट दर वाढ करण्यात आले. या दरवाढीचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांसह मुंबई, पुणे यासह राज्य व परराज्यातील प्रवाशांना बसत आहे. उड्डाणपूलाच्या या कामामुळे आगामी कमीत- कमी दोन ते तीन वर्ष या बसस्थाकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट वाढीचा फटका बसणार आहे.
कराड ते सातारा एसटी प्रवासासाठी सध्या 80 रुपये असलेले तिकीट भाड्यात 10 रुपयांनी वाढ होऊन ती 90 रुपये झाले आहे. आता या भाडेवाढीचा फटका विद्यार्थ्यांनाही पुढील महिन्यापासून बसू शकतो. त्यामुळे विद्यार्थीही हवालदिल झाले आहेत. कारण एसटी बसच्या विद्यार्थ्याच्या पासच्या पैशात वाढ होवू शकते. ग्रामीण भागातून दररोज ये- जा करणाऱ्या नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांना या तिकीट दर वाढीचा सर्वात जास्त मोठा फटका बसणार आहे. उड्डाणपूलाच्या कामामुळे महामार्गावरून कराड बसस्थानकात एसटी 15 ते 20 मिनिटांत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होत होती. परंतु आता जवळपास एक तासाचा वेळ लागू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळही वाया जात असून तिकिट दरही वाढल्याने प्रवाशाच्यांत नाराजी दिसत आहे.
एसटी प्रशासनाला प्रवाशांनी सहकार्य करावे – शर्मिष्ठा पोळ
कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने कराड बसस्थानकातून ये- जा करणाऱ्या बसेसचे तिकीट दर वाढले आहेत. ढेबेवाडी फाटा व वारूंजी फाटा असे एसटीला फिरून जावे लागत आहे. ग्रामीण भागातील गाड्यांना एक टप्पा वाढ होत असल्याने 5 रूपये तर ज्यांना दोन्ही टप्प्यावरून प्रवास करावा लागत आहे, त्यांना 10 रूपये तिकीट दर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांनी एसटी महामंडळ प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आगार प्रमुख शर्मिष्ठा पोळ यांनी केले आहे.