भिवंडीत छत्रपती शिवरायांच्या शिव मंदिराचे उद्घाटन!! ही आहेत मंदिराची खास वैशिष्ट्ये

Shiva temple
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज भिवंडी (Bhivandi) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या पहिल्या शिवमंदिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे. या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ऐतिहासिक किल्ल्याच्या धर्तीवर साकारलेल्या या मंदिरामुळे शिवप्रेमींना महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्याने अनुभवता येणार आहे.

शिवमंदिराची वैशिष्ट्ये

अडीच हजार चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेल्या या भव्य मंदिराची रचना गडकिल्ल्यांच्या स्थापत्यशैलीवर आधारित आहे. मंदिराभोवती सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाची तटबंदी असून, त्यामध्ये मजबूत बुरूज, महाद्वार आणि टेहळणी मार्गांची रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यावर ४२ फूट उंचीचे सभामंडप असून त्याभोवती गोलाकार बुरूज आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंचीही ४२ फूट इतकी असून, संपूर्ण बांधकाम दगडी वास्तुशैलीत करण्यात आले आहे.

या मंदिरातील प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली साडेसहा फूट उंचीची भव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तसेच मंदिराच्या प्रत्येक खांबांवर कोरीव नक्षीकाम असून, महिरपी कमानींनी या वास्तुशिल्पाला देखणे सौंदर्य प्राप्त झाले आहे.

इतिहासाचे जिवंत दर्शन

या मंदिराच्या तटबंदीच्या आत ३६ वेगवेगळे विभाग आहे. त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे चित्रण करणारी भव्य शिल्पे साकारण्यात आली आहेत. शिवरायांचा जन्म, अफजलखान वध, राज्याभिषेक, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला हा प्रसंग अशा ऐतिहासिक घटनांचे दर्शन येथे पाहिला मिळणार आहे.

उभारणीसाठी मोठा आर्थिक निधी

महत्वाचे म्हणजे, या मंदिराच्या उभारणीसाठी ७ ते ८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. ह. भ. प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी या मंदिराची संकल्पना साकारली.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य उभारण्यातले योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले की, “महाराजांनी देव, देश आणि धर्म रक्षणासाठी आयुष्य वेचले. आज आपण मंदिरांमध्ये जाऊ शकतो, साधना करू शकतो, हे त्यांच्याच पराक्रमामुळे शक्य झाले आहे. जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही, तसंच शिवरायांचे दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही देवाचं दर्शन फळणारे नाही.”

त्याचबरोबर, “छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीही इथे आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ माँसाहेबही इथे आहेत. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं राष्ट्रमंदिर आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.