हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मोठा प्रभावाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसने तर फक्त 16 जागा जिंकल्या. त्यामुळे आता पक्षाच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) यांच्या नावाला प्रदेशाध्यक्षपदासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. चव्हाण यांना दिल्लीला तातडीने बोलावण्यात आले असून, त्यांनी तेथे रवाना झाल्याचेही सांगितले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचार करत असल्याचे म्हणले जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही विधानसभेतील पराभवाचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी नव्या नेतृत्वावर भर दिला आहे. नवे नेतृत्व म्हणून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहत आहेत. कारण, पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेले नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.