साताऱ्यातील घटना : पोक्सोप्रकरणात हेळगावच्या एकाला तीन वर्षे सक्तमजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (पोक्सो) केल्याप्रकरणी वसंत उत्तम वायदंडे (रा. हेळगाव, ता. कराड) याला 3 वर्षे सक्तमजुरी, 3 हजार रुपये दंड तो न दिल्यास 3 महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी ठोठावली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, साताऱ्यातील एक अल्पवयीन मुलगी 26 मे 2018 रोजी घरात एकटीच होती. यावेळी वसंत वायदंडे याने मुलीच्या घरात जावून दरवाजा लावून घेतला. मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलगी घाबरली व तिने आरडाओरडा करत पळून गेली. पीडित मुलीने घडलेल्या घटनेची माहिती स्वतःच्या आईला दिल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सदरील घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास केला. या गुन्ह्याचा तपास सपोनि श्रीकृष्ण पोरे यांनी करून वायदंडे याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी विषेश सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्यासमोर झाली. न्यायालयात सहा साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी व पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील नितीन मुके यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश पवार, शमशुद्दीन शेख, अजित फरांदे, वैभव पवार, अमित भरते, राजेंद्र कुंभार, गजानन फरांदे, क्रांती निकम, पद्मा जायकर, रेहाना शेख यांनी सहकार्य केले.

Leave a Comment