नवी दिल्ली । उत्तर भारतातील ‘पान मसाला’ या ग्रुपच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला 400 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अवैध व्यवहार (Unaccounted Transactions) आढळले आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी संलग्न केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात CBDT ने शुक्रवारी ही माहिती दिली.
CBDT च्या म्हणण्यानुसार, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने गुरुवारी कानपूर, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि कोलकाता येथे असलेल्या ग्रुपच्या एकूण 31 ठिकाणी छापे टाकले. पान मसाला बनवणारा हा ग्रुप रिअल इस्टेटचा व्यवसायही करतो. या छाप्यांमध्ये, ग्रुपचे 400 कोटींपेक्षा जास्त रकमेचे अवैध व्यवहार उघडकीस आले आहेत. या निवेदनात ग्रुपची ओळख दिलेली नाही.
निवेदनानुसार, पान मसाला आणि रिअल इस्टेट व्यवसायाच्या बेहिशेबी विक्रीतून हा ग्रुप प्रचंड नफा कमावत होता. या ग्रुपने बनावट कंपन्यांद्वारे आपल्या व्यवसायात मिळविलेला हा नफा पुन्हा गुंतविला.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने या छाप्यादरम्यान 52 लाख रुपये रोख आणि सात किलो सोने जप्त केले. आरोपी ग्रुपने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आपला व्यवसाय देशभर पसरविला होता. या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून, या ग्रुपने फक्त तीन वर्षांत बँकांकडून सुमारे 226 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला.