लातूर प्रतिनिधी। आयकर विभागाच्या वतीने आज लातूर मध्ये खासगी ट्युशन क्लासेस परिसरामध्ये धाडी टाकण्यात आल्या. क्लासेस परिसरातील मोठ्या क्लासेस वरती एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या टाकण्यात आलेल्या धाडीत आयकर विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या दिमतीला पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत आहे. यामुळे खाजगी क्लासेसने आपल्या नियमित वर्गांना आज सुट्टी दिली असल्याचे समजते.
लातूर शहरात राज्यातील आणि परराज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विषयाच्या तयारीसाठी लातुरात क्लासेसचे प्रस्त मोठे आहे. त्यात क्लासेसच्या फिस भरमसाठ आहेत. यामुळेच आयकर विभागाने आज खाजगी क्लासेसवर अनेक ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या आहेत. या बाबतीत अधिक तपशील हाती आलेला नाही.
दरम्यान आज सकाळीच्या धाडीमुळे काही खाजगी क्लास वाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे परिसरात क्लासेस ना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली. परिणामी आज सर्व विद्यार्थी क्लास न करता घरी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी नागरिकांची चांगलीच गर्दी क्लासेसच्या बाहेर जमलेली पहायला मिळाली. सध्या ही कारवाई कोण कोणत्या क्लासेसवर झाली याबाबत अजून वृत्त हाती लागले नसून चौकशी चालू असल्याचे फक्त अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान एकाच वेळी अनेक खासगी ट्युशन वर आयकर विभागाची धाड पडल्याने सर्वांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.