हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर रविवारी रात्री पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळ, घरे, दुकाने यांवर केलेल्या हल्ल्यात 11 जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला. यामागे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा हात असल्याची शंका व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर आज हिंदु एकता आंदोलनाचे प्रांतिक प्रतिनिधी विनायक पावसकर यांनी दुपारी कराडात पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज रात्रीपासून विक्रम पावसकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
कराड येथे विनायक पावसकर यांनी आज हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुसेसावळी दंगलीमागे काही लोकांचा हात असल्याचा थेट आरोप केला. तसेच त्यांनी 14 प्रश्न उपस्थित करत मुलगा विक्रम पावसकर याच्यावर विनाकारण आरोप केल्याचे सांगितले. तसेच ज्या मुलाने पोस्ट व्हायरल केली त्याला तो कराडमध्ये कुणा कुणाला भेटला का? त्याला 24 तासानंतर का अटक करण्यात आली? तोपर्यंत तो कुणा कुणाला भेटला? याची चौकशी झाली पाहिजे. वास्तविक या घटनेतील आरोपींना हजर करणारे व त्यांना पाटीशी घालणारे कोण असतील त्यांना अटक करण्याची कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली.
रुग्णालयासमोर मृतदेह न घेता संतप्त जमावाची पावसकरांच्या अटकेची मागणी…
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काल रविवारी रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार (वय 27, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, सोमवारी पुसेसावळी दंगलप्रकरणात मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला. यावेळी त्यांनी थेट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.