लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण ही टेस्ट सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर मयंक अग्रवाल याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. सराव करत असताना मोहम्मद सिराजचा बाऊन्सर मयंक अग्रवालच्या डोक्याला लागला. या सिरीजमधून मयंक अग्रवाल बाहेर झाल्यामुळे आता टीम इंडियापुढे ओपनिंगला कोणाला खेळवायंच हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या अगोदर शुभमन गिल,वॉशिंग्टन सुंदर,आणि आवेश खान हे तीन खेळाडू आधीच टेस्ट सीरिजमधून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. यानंतर मयंक अग्रवाल शुभमन गिलऐवजी ओपनिंगला खेळेल, असं सांगितलं जात होतं. पण आता मयंक अग्रवालही बाहेर गेल्यामुळे केएल राहुल रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. केएल राहुलने सराव सामन्यामध्ये शतक केलं होतं, त्यामुळे तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
सूर्या-पृथ्वी कधी पोहोचणार?
दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्या कोरोनाच्या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. यामुळे या दोघांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे दोघेजण पुढच्या 24 तासांमध्ये इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही या दोघांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यानंतरच ते टीममध्ये प्रवेश करू शकतील. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या टेस्टपासून उपलब्ध होणार आहेत.