हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडविरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी (IND Vs ENG Test) भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झालं आहे. बुमराहला रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती, परंतु आता तो धर्मशालामध्ये पुन्हा एकदा ॲक्शन करताना दिसणार आहे. आत्तापर्यंत पार पडलेल्या ४ कसोटी सामन्यात भारताने ३-१ ने आघाडी घेतली आहे. आता धर्मशाळा येथील पाचवी कसोटी जिंकण्याचा रोहित सेनेचा मानस असेल.
जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीसाठी उपल्बध असेल परंतु भारताचा दुसरा स्टार खेळाडू केएल राहुल मात्र या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे यावेळी समोर आले आहे. याच कारण म्हणजे राहुल हा दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आता लंडनला गेला आहे. उपचारानंतर राहुलला आणखी काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरचे नाव सुद्धा पाचव्या कसोटीसाठी जाहीर करण्यात आलेलं नाही. शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघ जाहीर झाला तेव्हा सुंदरला संघात संधी मिळाली होती, मात्र आता त्याला वगळण्यात आलं आहे.
५ कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत ३-१ ने आघाडीवर आहे. यशस्वी जैस्वाल, रोहित शर्माची फलंदाजी, नवोदित युवा खेळाडूंचा दमदार खेळ आणि अश्विन- जडेजाची फिरकी या जोरावर संपूर्ण स्पर्धेत भारताने देदीप्यमान कामगिरी केली आहे. काही अपवाद वगळता भारताने या सिरीज मध्ये एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. आता पाचव्या कसोटी सामन्यात हाच फॉर्म कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.
पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.




