हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय वोल्टेज सामना पाहायला (IND Vs PAK Match) मिळणार आहे. दोन्ही संघ 596 दिवसांनी टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्येही मोठी उत्सुकता आहे. भारताने आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला होता, तर पाकिस्तानच्या संघाला मात्र मागच्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचाच या इच्छेने दोन्ही संघ मैदानात उतरतील.
भारतीय संघाबद्दल सांगायचं झाल्यास, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर संपूर्ण मदार आहे. विराट कोहली या वर्ल्डकप मध्ये सलामीला येत असल्याने त्याच्याकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पाकिस्तान विरुद्ध नेहमीच विराट आणि रोहितची बॅट तळपते. त्यामुळे आजही या दोघांकडून मोठी खेळी पाहायला मिळू शकते. याशिवाय मधल्या फ़लित सूर्यकुमार आणि रिषभ पंतची जादू पाहायला मिळेल. हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळी आणि बूम बूम बुमराहच्या भेदक माऱ्याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.
तर दुसरीकडे पाकिस्तान संघाची परिस्थिती वेगळी आहे. पहिल्या सामन्यात नवख्या अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ अजूनही सावरलेला नाही. कर्णधार बाबर आझम, विकेटकिपर मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, आणि शादाब खानवर पाकिस्तानची संपूर्ण भिस्त आहे. आज भारताविरुद्ध जिंकायचं असेल तर या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. अन्यथा बलाढ्य भारताचा पराभव करणं पाकिस्तान साठी सोप्प काम नसेल.
कुठे होणार भारत vs पाक सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक 2024 सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
सामना कधी सुरू होईल?
हा हाय वोल्टेज सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
2024 च्या T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स 1 HD/SD वर उपलब्ध असेल आणि हिंदी कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स हिंदी HD/SD वर उपलब्ध असेल.
मोबाईल किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी पाहायची?
डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि सब्स्क्रिबशन घ्यावे लागेल.